आली रे आली…जळगावात कोरोनाची लस आली!

Jalgaon जळगाव जळगाव जिल्हा

जळगाव >> पुण्यातील सिरम इन्स्टिट्युटची “कोविशील्ड’ ही कोरोना प्रतिबंधक लस बुधवारी जळगाव शहरात पोहोचली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी अधिष्ठाता व जिल्हा शल्यचिकित्सकांना सोबत घेऊन ही लस ज्या ठिकाणी दिली जाणार आहे, त्या जागेची बारकाईने पाहणी केली. पहिल्या दिवशी म्हणजेच शनिवारी (दि.१६) जिल्ह्यात नऊ केंद्रांवर प्रत्येकी १०० आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस दिली जाणार आहे.


जगभर कोरोना महामारीने थैमान घातले आहे. त्यावर “कोविशील्ड’ लसीची निमिर्ती करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणास सकाळी ९ वाजता सुरुवात होणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बुधवारी संध्याकाळी ६ वाजता पाहणी केली. अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, उपअधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, आरएमओ डॉ. विजय जयकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव सोनार, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. इम्रान पठाण उपस्थित होते.

जिल्हाधिकारी राऊत यांनी महाविद्यालय व रुग्णालयाचा परिसर पहिला. त्यात नेत्रकक्ष, अधिष्ठाता कार्यालय परिसर, एआरटी सेंटर, रुग्णालय परिसर, अपघात, ओपीडी विभाग पाहून चर्चा केली. परिसरातील सुशोभीकरण, अद्ययावत वाहन पार्किंग सुविधा, रुग्णालय व्यवस्थापन पाहून समाधान व्यक्त करीत प्रशंसा केली.

या केंद्रांवर होईल लसीकरण :
एक लस ५ एमएलची असेल. एका कुपीत १० डोस आहेत. शनिवारी जामनेर, मुक्ताईनगर, चोपडा या तीन उपजिल्हा रुग्णालयात, भुसावळ, चाळीसगाव, पारोळा या तीन ग्रामीण रुग्णालयात तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नानीबाई अग्रवाल रुग्णालय, जैन रुग्णालय, शिवाजीनगर असे एकूण नऊ केंद्रावर लसीकरण करण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस.चव्हाण यांनी कळवले.