चुंचाळे येथे ३० वर्षीय महिलेची आत्महत्या कारण गुलदस्त्यात ?

आत्महत्या क्राईम यावल साकळी

चुंचाळे प्रतिनिधी >>साकळी येथून जवळच असलेल्या चुंचाळे येथे ३० वर्षीय विवाहित महिलेने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली आहे. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे.

विवाहित महिलेने आत्महत्या का केली असावी हा प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यात आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण दिवसागणिक वाढत चालले आहे. या गंभीर विषयाकडे महाराष्ट्र सरकारने लक्ष देणे अत्यंत गरजेचे झाले आहे. साकळी येथून जवळच असलेल्या चुंचाळे येथील सोनी योगेश पाटील असे मृत विवाहित महिलेचे नाव आहे.

विवाहितेने आत्महत्या का केली हे मात्र अद्यापही कळू शकले नाही. यावल तालुक्यातील चुंचाळे येथील रहिवासी योगेश अशोक पाटील यांनी दिलेल्या खबर नुसार चुंचाळे गावात ते त्यांची पत्नी सोनी पाटील (वय ३०) व एक ९ व एक ६ वर्षीय अशा दोन मुलांसह राहत असे, योगेश हे आपला उदरनिर्वाह रिक्षा चालवून कुटुंबाचा संसार चालवत असून आज मंगळवारी दिवशी शेत मजूर घेऊन ते रिक्षाद्वारे आडगाव येथे गेले होते.

यादरम्यान त्यांना चार वाजेला त्यांच्या पत्नी सोनी पाटील यांनी आत्महत्या केल्याचे कळले. तेव्हा त्यांनी थेट घरी येऊन पाहिले असता त्यांची पत्नी सोनी हिने राहत्या घराच्या छताला साडीच्या साह्याने गळफास लावलेल्या मृतवस्थेत आढळून आली.

याबाबत यावल पोलिसात योगेश पाटील यांनी माहिती दिली असता घटनास्थळी यावलचे पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार, पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले, पोलीस कर्मचारी सुशील घुगे आदी दाखल झाले व मृतदेह काढून यावल ग्रामीण रुग्णालयांमध्ये आणण्यात आला आहे.

मयत यांच्यावर आज बुधवारी शवविच्छेदन करण्यात येणार असल्याचे कळते. सदर विवाहितेने अशा प्रकारे आत्महत्या केल्याने गावातुन हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मयत सोनी पाटील हिचे माहेर मध्यप्रदेश मधील भोपाल जिह्याचे असुन तिच्या पश्चात पती योगेश पाटील तसेच ९ व ६ वर्षाची अशी दोन मुलं आहेत. तिने आत्महत्या का केली याचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.