चोपड्यातील भार्डू शिवारात आढळला बिबट्या!

अडावद चोपडा तापी शेती

चोपडा राजेंद्र पाटील प्रतिनिधी >> तालुक्यातील भार्डू येथे १३ डिसेंबरला सकाळी ११ वाजेच्या सुमारास सालगडी बैल बांधण्यास गेला असता त्याच्यावर बिबट्याने झडप घालण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. त्यानंतर रात्री ११ वाजता वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना बिबट्या पकडण्यात यश मिळाले.

भार्डू येथील शेतकरी मिलिंद पाटील यांच्या शेतात कामाला असलेला सालगडी नाना पावरा हा सकाळी ११ वाजता शेतात बैल बांधत असताना अचानक त्याला बिबट्या दिसल्याने तो घाबरून गावाकडे धावला. गावात पोहोचल्यानंतर त्याने बिबट्या दिसल्याची माहिती दिली. बिबट्या कुठे आहे, हे पाहण्यासाठी त्याच्या पावलांचे ठसे पाहून मार्गक्रमण करत होते.

या वेळी मिलिंद पाटील यांच्या शेतातच नागरिकांपासून ५० फुटावर बिबट्या सकाळी ११ वाजेपासून ठाण मांडून बसला आहे. तो जखमी अवस्थेत असल्याचे चोपडा येथील वनक्षेत्रपाल दत्तात्रय लोंढे यांनी सांगितले. दरम्यान, दुपारी २ वाजेपासून त्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी ठाण मांडून बसले होते. तर रात्री ११ वाजेच्या सुमारास बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश आले आहे.

हा बिबट्या आजूबाजूच्या शेतात फिरत असून तो मिलींद पाटील यांच्या शेतापासून १०० मीटरमध्ये दिसून येत आहे. दरम्यान, भार्डू शिवारात कांदा लागवडीचे काम सुरु असल्याने सध्या अनेक ठिकाणी मजूर शेतात कामासाठी जात आहेत. त्यामुळे बिबट्याला तत्काळ जेरबंद करावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान, बिबट्याचे वृत्त परिसरात पसरल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये भीती पसरली आहे.