वृद्धेला सांगितले पुढे चोर आहेत, अंगावरचे दागिने काढताच गंडवले

क्राईम चाळीसगाव निषेध पाेलिस

राज देवरे प्रतिनिधी चाळीसगाव >> बँकेत पेन्शन घेण्यासाठी रस्त्याने पायी जाणाऱ्या ६५ वर्षीय वृद्धेला दुचाकीवरून आलेल्या तिघा चोरट्यांनी पुढे चोऱ्या होत आहेत. तुमच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून ते कागदाच्या पुडीत बांधून ठेवा, असे सांगितले. यानंतर वृद्धेजवळील सुमारे दीड तोळ्याचे सोन्याचे दागिने दिवसाढवळ्या हातोहात लंपास केले. शहरातील भडगाव रोडवरील मीलच्या पुढे शास्त्रीनगर वळणाजवळ सकाळी ११ वाजेच्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली.


शहरातील शास्त्रीनगरातील वृद्धा सुशीलाबाई दौलत पाटील ह्या बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास बँकेत पेन्शनची रक्कम काढण्यासाठी पायी जात होत्या. भडगाव रोडवरील शास्त्रीनगर कॉर्नर जवळ मोटारसायकलवरून तिघे चोरटे आले. त्यांनी वृद्धेस पुढे चोऱ्या होत आहेत. तुमच्याजवळ जेवढे सोने असेल ते काढून एका पुडीत बांधून घ्या, अशी बतावणी केली.

तिघा भामट्यांच्या सांगण्यावरून वृद्धेने आपल्या बोटातील साेन्याची अंगठी आणि मण्यांची पोत असे दीड तोळे सोन्याचे दागिने काढून घेतले व पुडी बांधली. तिघा भामट्यापैकी एकाने त्याच्या जवळील एक वस्तू काढून वृद्धेकडे त्या पुडीत ठेवली. नंतर हातचलाखी करत महिलेकडील दागिने घेऊन मोटारसायकलने पसार झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या घटनेने भेदरलेल्या वृद्धेने आपल्या कुटुंबीयांसह शहर पोलिस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगितला. महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला.