चाळीसगावला कोरोना विरुद्धच्या लढ्यात निवृत्त सैनिकांचा सहभाग

चाळीसगाव

तीन दिवस जनता कर्फ्यू

चाळीसगावः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुकारण्यात आलेला लॉकडाऊन अधिक प्रभावी व्हावा तसेच पोलीस यंत्रणेवर पडणारा ताण कमी व्हावा यासाठी चाळीसगाव तालुक्यातील सैन्यदलातून निवृत्त झालेल्या माजी सैनिकांची विशेष पोलीस अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

तीन दिवस पाळण्यात येत असलेल्या जनता कर्फ्यूतही ते महत्वाची भूमिका बजावणार आहे. गुरुवारी पोलीस ग्राउंडवर बोलावण्यात आलेल्या बैठकीत चाळीसगाव तालुक्यातील माजी सैनिकांना ओळखपत्र व नियुक्ती पत्राचे वाटप आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

देशाच्या सीमा रक्षणासाठी प्रसंगी प्राणाची आहुती देणारे सैनिक हे देशावर आलेल्या कोरोना सारख्या संकटकाळात निस्वार्थपणे व कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता पुढे येतात. ही निश्चितच अभिमानाची बाब असून त्यांचे हे योगदान चाळीसगाववासीय कायम स्मृतीत ठेववतील. ही कृतज्ञता आम्ही विसणार नाही. असे यावेळी आमदार मंगेश चव्हाण म्हणाले.

शुक्रवारी जनता कर्फ्यूत निवृत्त सैनिकांनी शहर पिंजून काढीत गस्त घातली. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ अन्वये पोलीस अधिकाऱ्यास जे अधिकार, कामे व विशेष अधिकार आहेत तेच विशेष पोलीस अधिकारी यांना चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन अंतर्गत क्षेत्रात असून दिलेल्या जबाबदारीचे शासनाच्या निर्देशानुसार पालन करावे. कुठल्याही प्रकारे अधिकाराचा गैरवापर न होऊ देता आपले कर्तव्य पार पाडावे. अशा सूचना उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास गावडे यांनी दिल्या आहे.

यावेळी प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास गावडे, तहसीलदार अमोल मोरे, पोलीस निरीक्षक प्रताप शिकारें, विजयकुमार ठाकूरवाड, पंचायत समिती गटनेते संजय पाटील आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *