दुचाकी घसरून चाळीसगाव तालुक्यातील देवळीतील तरुणाचा मृत्यू

अपघात क्राईम चाळीसगाव

चाळीसगाव प्रतिनिधी >> मालेगाव रस्त्यावरील बिलाखेड गावाजवळ मातीच्या ढिगाऱ्यामुळे दुचाकी घसरून तालुक्यातील देवळी येथील ३४ वर्षीय दुचाकीस्वार तरूण ठार झाला. शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.

सुनील शिवाजी कोळी असे मृत तरूणाचे नाव आहे. सुनील कोळी हा तरूण इलेक्ट्रिक फिटिंगचे काम आटोपून दुचाकीने देवळीकडे जात होता. बिलाखेड गावाजवळ मातीच्या ढिगाऱ्यामुळे त्याची दुचाकी घसरली.

या अपघातात मार लागल्याने त्यास ईश्वर आनंदा पाटील यांनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले.

या प्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलिस नाईक नितीन सोनवणे करत आहेत.

मृत सुनील कोळी यांच्या पत्नीचे दीड वर्षापूर्वीच निधन झाले होते. त्यांच्या पश्चात आई-वडील व दोन लहान मुले असा परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.