जुन्या वादातून चाळीसगावात चॉपर हल्ला ; एक जण गंभीर जखमी तर माजी नगरसेवकासह ५ जणांवर गुन्हा

क्राईम चाळीसगाव

चाळीसगाव प्रतिनिधी ::> शहरातील नेताजी चौकात शनिवार रात्री मागील भांडणाच्या कारणावरून चार ते पाच जणांनी दोघांवर चॉपरने हल्ला केला असून यात एक जण गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी माजी नगरसेवक प्रभाकर पांडुरंग चौधरी यांच्यासह पाच जणांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

नेताजी पालकर नगरमधील जगदीश जगन्नाथ महाजन यांनी या संदर्भात तक्रार दिली आहे. त्यानुसार भूषण चौधरी याने जुना वाद मिटवण्याच्या बहाण्याने नेताजी चौकातील म्हसोबा मंदिराजवळ ३ रोजी रात्री ७.४० वाजता जगदीश महाजन यांना बोलवले होते.

तेथे पोहचल्यानंतर जगदीश महाजन हे दुचाकीवरून खाली उतरले असता प्रभाकर चौधरी व किरण चौधरी यांनी त्यांना शिवीगाळ करून पकडले. तर भूषण चौधरी व किरण चौधरी याचा लहान भाऊ हे चॉपर व चाकू घेवून महाजन यांच्यावर अंगावर धावून गेले.

महाजन यांच्यावर वार करत असताना महाजन यांचा भाचा शुभम राजेंद्र माळी त्यांना वाचवण्यासाठी आला. तर भूषण चौधरी याने त्याच्या उजव्या हातावर व किरण चौधरी याच्या लहाण भावाने शुभमच्या छातीवर हत्याराने वार केले.

यात तो गंभीर जखमी झाला. तर बादल चौधरी याने चॉपरने शुभमच्या कमरेवर व पाठीवर वार केले. प्रभाकर चौधरी व भूषण चौधरी यांनी जगदीश महाजन यांच्या छातीवर व पाठीवर बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली.

गर्दी जमू लागल्याने महाजन यांना शिवीगाळ करत हल्लेखोर पसार झाले. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात प्रभाकर चौधरी, किरण चौधरी, भूषण चौधरी, किरण चौधरी याचा लहान भाऊ व बादल चौधरी यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला अाहे. तपास पोलिस पोलिस उपनिरिक्षक मच्छिंद्र रणमाळे, महावीर जाधव करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *