जामनेर तालुक्यात तलवार-चाकू हल्ला ; दोन जण गंभीर जखमी

Politicalकट्टा कट्टा जामनेर निवडणूक सिटी न्यूज

जामनेर प्रतिनिधी >> तालुक्यातील देवपिंप्री ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारावरून गुरूवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास वाद उद्भवला. यातून तलवार व चाकूहल्ला झाला असून दोन जण जखमी झाले. यात परस्परांविरुद्ध तक्रारी दाखल झाल्या आहेत. गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. मतदानाच्या पूर्वसंध्येला झालेल्या प्रकारामुळे निवडणुकीला गालबोट लागले.

एका गटातर्फे भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष तुकाराम निकम यांच्यासह सहकाऱ्यांविरूध्द जामनेर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. यमुनाबाई सपकाळे या देवपिंप्री ग्रामपंचायतीसाठी वार्ड क्रमांक ४ मधून निवडणूक लढवत आहेत. त्यांचा भाऊ नितीन प्रकाश सोनवणे हा देवपिंप्री फाट्यावर वास्तव्य करतो.

देवपिंप्री फाट्यावर बसून नितीन हा मतदारांशी फोनवर संपर्क करीत होता. नितीन एकटा असल्याचे पाहून गावातील विरोधक व भाजपचे माजी तालुकाध्यक्ष तुकाराम निकम यांनी सुरेश शिंदे, चंद्रशेखर शिंदे, पप्पू शिंदे, त्यांचे दोन शालक, अमृत शिंदे, नितीन पाटील यांचेसह समर्थकांना घेऊन फाट्यावर आले. त्या ठिकाणी निकम यांनी शाब्दीक वाद घातला तर समर्थकांनी तलवार व चाकूहल्ला केला. तर एकाने पिस्तूल काढून धाक दाखवला, असे आरोप जखमी नितीन सोनवणे यांनी पोलिसांना माहिती देताना केले.

चाकूने केले वार, पिस्तुलही काढले : नितीन विकास पाटील यांच्यावर गावातच चाकूने तीन वार केले आहेत. त्यांना उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल केले आहे. नितीन यांना झालेली गंभीर इजा पाहता आपल्यावर गुन्हा दाखल होईल ही बाब ज्ञात असल्याने नितीन सोनवणे यांनी डोक्याला मारून घेतले व कार्यकर्त्यावर आरोप करीत आहेत. आमचे सहकारी नितीन पाटील यांना पिस्तूल लावल्याचे आरोपही निकम यांनी याबाबत कायदेशीर तक्रार देणार असल्याचेही स्पष्ट केले.