बोदवडात प्रकाश हॉटेलमध्ये बिलावरून राडा करत ८ जणांनी मालकालाच केली मारहाण

क्राईम बोदवड

बोदवड प्रतिनिधी ::> शहरातील मलकापूर रस्त्यावरील प्रकाश हॉटेल व परमिट रूम बिअर बारमध्ये जेवणाचे बिल देण्याच्या कारणावरून आठ ते दहा तरुणांनी हॉटेल चालकाच्या दोन पुतण्यांना मारहाण व शिवीगाळ केली. शुक्रवारी दुपारी अडीच ते साडेतीन या वेळेत ही घटना घडली. या प्रकरणी प्रफुल्ल सुरेश ठोसरे व अनोळखी आठ ते दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. या घटनेमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

शुक्रवारी प्रफुल्ल सुरेश ठोसरे यांच्यासोबत आठ ते दहा तरुण जेवणासाठी प्रकाश हॉटेलमध्ये आले. त्यांनी मनोहर सत्रमदास फबियाणी यांचे पुतणे रमेश देविदास बियाणी यांना शिवीगाळ व धमकी देऊन काचेची बाटली व ग्लास डोक्यात मारहाण करून दुखापत केली. तसेच पाण्याच्या जारने देखील मारहाण केली.

त्यांच्या हाताला मार लागला असून योगेश देविदास फबियाणी याला सोबतच्या आठ-दहा लोकांनी तोंडावर मारहाण करून दुखापत केली. हॉटेल चालक मनोहर सत्रमदास फबियाणी यांच्या फिर्यादीवरून प्रफुल्ल ठोसरे व अनोळखी आठ ते दहा जणांविरुद्ध शुक्रवारी रात्री दहा वाजता येथील पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास व्ही.आर. महाजन करत आहेत.