चुका झाकण्यासाठी राज्य सरकारचे केंद्रावर आरोप

Politicalकट्टा कट्टा धुळे महाराष्ट्र माझं खान्देश

धुळे >> राज्यातील जनतेने दिलेल्या जनादेशाचा अनादर करून तिघाडी सरकार सत्तेत आले आहे. वर्षभरात हे सरकार सर्व आघाड्यांवर अयशस्वी ठरले आहे. महाविकास आघाडी सरकार केंद्र सरकारवर आरोप करून त्यांच्या चुका झाकण्याचे काम करत असल्याची टीका भाजपचे राज्य प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांनी पत्रकार परिषदेत केली.

राज्यातील महाआघाडी सरकारने नुकताच एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला. त्यानिमित्त त्यांची पत्रकार परिषद झाली. लक्ष्मण सावजी म्हणाले की, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात अनेक चांगले उपक्रम राबवण्यात आले. ते मोडीत काढण्याचा कार्यक्रम महाविकास आघाडी सरकारने सुरू केला आहे. अनेक घोटाळे सरकारने केले आहे. कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेवर अत्याचार झाले.

सरकारविरोधात आवाज उठवणाऱ्या पत्रकारावर गुन्हे दाखल होतात. सरकारकडून महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न होत आहे. सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे सर्व क्षेत्रात असुरक्षितेची भावना निर्माण झाली आहे. सरकारकडून सामाजिक प्रश्नांचे राजकारण केले जात असल्याचेही ते म्हणाले. कंगना प्रकरणी मनपाकडून नव्हे तर ठाकरे कुटुंब व राऊत यांच्याकडून नुकसानभरपाई वसूल झाली पाहिजे असेही ते म्हणाले. जलयुक्तच्या चौकशीला पक्ष घाबरत नसल्याचे ते म्हणाले. खासदार डॉ. सुभाष भामरे, महापौर चंद्रकांत सोनार, भाजप जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, हिरामण गवळी आदी उपस्थित होते.