भुसावळ > कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे बोर्डाच्या सूचनेनुसार ३० जूनपर्यंत भारतीय रेल्वेच्या सर्व प्रवासी गाड्या पूर्णपणे थांबविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती भुसावळ रेल्वे वाणिज्य विभागातर्फे देण्यात आली आहे. कोणतीही प्रवासी गाडी प्रारंभीच्या स्थानकावरून धावणार नसल्याचे रेल्वे प्रशासनाने कळवले आहे.
मेल एक्स्प्रेस, मेमो ट्रेन, सर्व ब्रांच लाईन, दुरांतो एक्सप्रेस, लोकल सर्व रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या असून भुसावळ विभागातून कोणतीही प्रवासी गाडी धावणार नाही. माल व पार्सल गाड्या फक्त जीवनावश्यक वस्तूंसाठी कार्यरत राहतील.
भुसावळ विभागातील सर्व स्थानकांची आरक्षण केंद्रे, अनारक्षित तिकीट केंद्रे पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत. हे कार्यालय सुरू झाल्यानंतर परतावा आरक्षण कार्यालयामार्फत होईल आणि हा परतावा पूर्ण दिला जाईल. प्रवाशांना प्रवासाच्या तारखेपासून सहा महिन्यापर्यंत रद्द केलेल्या गाड्यांची तिकिटे रद्द करण्यासाठी आरक्षण कार्यालयात आरक्षित तिकिटे सादर करता येणार आहेत, शिवाय आरक्षण कार्यालय सुरू झाले की प्रवाशांनी तिकीट रद्द करण्याची घाई करू नये कारण त्यामुळे गर्दी होऊ शकते आणि त्याचा आरोग्यावर परिणाम होण्याची भीती आहे.
आरक्षणाचा परतावा हा सुरक्षित आहे आणि तो सहा महिन्यापर्यंत मिळणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने कळवले आहे. ऑनलाइन तिकीट धारकांचे तिकीट हे ऑनलाइन पध्दतीने रद्द करावे लागणार असून परतावा हा बँक खात्यात जमा होणार आहे.
रेल्वे बोर्डाने हे स्पष्ट केले आहे की, कोरोनाच्या दुष्परीणामांमुळे भारतीय रेल्वेची प्रवासी वाहतूक सेवा पूर्णपणे रद्द झाली आहे आणि प्रवाशांना कोणत्याही परीस्थितीत रेल्वे स्थानक परीसरात प्रवेश करण्याची परवानगी नाही. श्रमिक विशेष रेल्वे या गाड्या राज्य सरकारच्या विनंतीवरून विविध ठिकाणी अडकलेल्या प्रवासी कामगार, यात्रेकरू, पर्यटक, विद्यार्थी आणि इतर व्यक्तींसाठीच राज्य सरकारच्या विनंतीवरून चालवली जाणार आहे. मात्र त्यासाठी केवळ राज्य सरकारशी संपर्क साधावा लागेल, असेही रेल्वे प्रशासनाने कळवले आहे.