भुसावळातील नगरसेवकाच्या भावाला चाकू दाखवून लुटले

क्राईम निषेध पाेलिस भुसावळ

भुसावळ प्रतिनिधी >> शहरातील दीनदयाळ नगरातील फकीर गल्ली, मशिदीच्या मागील भागात चाकूचा धाक दाखवून सत्ताधारी भाजप नगरसेवकाच्या भावाला धमकावत तीन भामट्यांनी लूटले. त्याच्याकडील चार हजार ९०० यांची रोकड लांबवल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या प्रकरणी एकाला अटक केली.

नगरसेवक महेंद्रसिंग उर्फे पिंटू ठाकूर यांचे बंधू तथा रिक्षाचालक अनिल ठाकूर (रा. सिंधी कॉलनी, मोहन रॉकेल डेपोजवळ, भुसावळ) हे रजा टॉवरकडे दुचाकीने (क्र.एमएच.१९-डी.ए.८९५५) निघाले होते.

तत्पूर्वी ते पैसे घेण्यासाठी जामनेर रोडवरील मशिदीमागे राजू डोलू व अमीर यांच्याकडे आले. त्यावेळी संशयिताने त्यांच्या गळ्यावर चाकू लावला तर दुसऱ्याने पँटच्या उजव्या खिशातील चार हजार ९०० रुपये काढून घेतले.

काही सेकंदात तिन्ही भामटे संशयित पसार झाले. संशयित अशोक कोळी उर्फ भाचा आणि जावेद उर्फ पोटली (दोघांचे पूर्ण नाव नाही) व अन्य एका अनोळखीविरुद मध्यरात्री गुन्हा दाखल झाला. संशयित अशोक कोळी उर्फ भाचा यास डीबी पथकाने अटक केली आहे.