जळगाव >> भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट क्रेडिट को-ऑप. सोसायटीचा सुमारे अकराशे कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे. पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने २७ नोव्हेंबर रोजी जळगावात छापेमारी करून दोन ट्रक कागदपत्रे, संगणक जप्त करून नेले आहेत.
या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेला सीए महावीर जैन, विवेक ठाकरे, सुजीत वाणी व कमलाकर कोळी यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केले आहेत. त्यावर मंगळवारी सुनावणी होणार होती; परंतु सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांनी खुलासा सादर करण्यासाठी वेळ मागून घेतली. त्यामुळे मंगळवारी ही सुनावणी होऊ शकली नाही.
आता ५ जानेवारी २०२१ रोजी सुनावणी होणार आहे. पुणे विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस.एस. गोसावी यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सुजीत बाविस्कर, धरम साखला, महावीर जैन, विवेक ठाकरे व कमलाकर कोळी हे सर्व संशयित सध्या येरवडा कारागृहात न्यायालयीन बंदी आहेत.
गुन्ह्यात संशयित असलेल्या कुणाल शहाचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. दरम्यान, दाखल जामिन अर्जावर ५ जानेवारी रोजी पुढील सुनावणी हाेणार असल्याने त्याकडे ठेवीदारांचे लक्ष लागले.