भडगावातील मोटारसायकल चोरट्यांनी अन्य गुन्ह्यांची दिली कबुली

क्राईम भडगाव

भडगाव प्रतिनिधी >> येथील पाटील वाड्यातील संतोष शिवराम धनगर यांची घरासमोर लावलेली दुचाकी चोरीला गेली होती. या प्रकरणी भडगाव पोलिसांनी गुप्त बातमीदारातर्फे माहिती घेतली असता दोन जण धुळे येथे विक्रीसाठी दुचाकी घेऊन गेल्याची माहिती मिळाली होती.

त्यानंतर पोलिस निरीक्षक अशोक उतेकर यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक आनंद पटारे, सुशील सोनवणे, पोलिस नाईक प्रल्हाद शिंदे, हेड कॉन्स्टेबल किरण ब्राम्हणे, पोलिस नाईक लक्ष्मण पाटील, ईश्वर पाटील, नितीन रावते, स्वप्निल चव्हाण यांच्या पथकाने धुळे पोलिस ठाण्यातील दोन पोलिसांना सोबत घेतले.

फागणे येथे दुचाकी विक्री करताना अजय दिगंबर जाधव (रा. खालची पेठ) व पप्पू ऊर्फ गणेश आनंदा माळी (रा. जकातदार गल्ली, भडगाव) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांनी ७ दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. या दोघांना न्यायालयाने २९ रोजी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. परंतु त्याचवेळी त्यांना पोलिस नाईक सचिन वाबळे यांनी दुसऱ्या गुन्ह्यात अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक अशोक उतेकर यांनी २९ रोजी दिली. यात मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे.