हॉटेलात वाद झाल्याने अनिल चौधरी यांच्या गटासह अन्य गटांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल

Jalgaon Jalgaon MIDC Politicalकट्टा कट्टा क्राईम जळगाव जळगाव जिल्हा भुसावळ

अनिल चौधरींसोबतच्या तरुणाची हाॅटेलात पिस्तूल काढून दहशत

जळगावजवळ असलेल्या हॉटेलमध्ये किरकोळ कारणावरून झालेल्या धक्काबुक्कीनंतर थेट रिव्हॉल्वर काढून दहशत पसरवणाऱ्या भुसावळच्या केदारनाथ सानपसह माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी, जळगाव महापालिकेतील भाजपचे गटनेता भगत बालाणी आणि अन्य १० जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी रात्री हा प्रकार घडला. रिव्हॉल्वरचा धाक दाखवणारा केदारनाथ सानप हा अनिल चौधरी यांच्याच सोबत हॉटेलमध्ये आला होता.

खेडी शिवारात न्यू महिंद्रा नावाची हॉटेल आहे. तिथे रविवारी रात्री अनिल चौधरी, भगत बालाणी, केदारनाथ सानप, चौधरी यांचा कार चालक गोलू आणि दुर्गेश ठाकूर जेवणासाठी आले होते. त्याच वेळी हॉटेलमध्ये मुकेश दत्तात्रय माळी, छोटू पाटील आणि त्यांचे तीन मित्र जेवण करीत होते. मुकेश माळी हे जळगावातील भाजप नगरसेवक सुनील माळी यांचे भाऊ आहेत. अनिल चौधरी यांनी जेवण आटोपल्यानंतर खुर्चीला लाथ मारुन कुत्र्याच्या अंगावर खुर्ची फेकली. त्यामुळे मुकेश माळी आणि त्यांच्या मित्रांशी त्यांचा वाद झाला. त्याचे पर्यावसन धक्काबुक्की आणि हाणामारीत झाले. हॉटेलमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या सर्व घटना चित्रीत झाल्या आहेत.

हाणामारी दरम्यान, केदारनाथ सानप याने अचानक रिव्हॉल्वर बाहेर काढून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. तेही चित्रीत झाले असून ते व्हायरल झाले आहे. पोलिस कर्मचारी मुकेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन चौधरी व माळी गटातील एकूण १० जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल झाला.

रिव्हॉल्वरचा परवाना; पण नियमांचे उल्लंघन
या गुन्ह्यात सानप याने रिव्हॉल्वर काढून दहशत माजवली आहे. त्याच्याकडे शस्त्राचा परवाना आहे. परंतू, सार्वजनिक ठिकाणी पिस्तूल काढून दशहत माजवल्याने परवान्याच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आर्म अॅक्ट कलम ३० प्रमाणे गुन्हा दाखल झाला.