अंजनीतून विसर्ग ; यंदा प्रथमच खळाळले नदीपात्र, रब्बीला फायदा

एरंडोल

एरंडोल ::> अंजनी नदीचे उगमस्थळ व पाणलोट क्षेत्रास सुरू असलेल्या पावसामुळे तालुक्यातील पळासदड येथील अंजनी प्रकल्पात ९० टक्के साठा झाला आहे. यानंतरही पाण्याची आवक सुरूच असल्याने गुरुवारी (दि.१०) रात्री धरणाचे तीन दरवाजे उघडून अंजनी नदीपात्रात ६०० क्युसेस वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला. परिणामी यंदाच्या पावसाळ्यात शुक्रवारी (दि.११) प्रथमच अंजनी नदी दुथडी भरून वाहिली. यामुळे परिसरातील विहिरी, कूपनलिकांची भूजल पातळी वाढून रब्बी हंगामाला फायदा होईल.

२४ तासांत ९ मिमी पाऊस
अंजनी मध्यम प्रकल्पाची उपयुक्त साठा क्षमता २२५.९२ दलघमी आहे. यापैकी सद्यस्थितीत ९० टक्क्यांच्या आसपास साठा आहे. गतवर्षी ११ सप्टेंबरला धरणात सुमारे ५५ टक्के साठा होता. दरम्यान, गेल्या २४ तासांत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ९ मिमी पाऊस झाला. हा पाऊस वाढल्यास विसर्ग देखील वाढेल.

गेल्या वर्षी उलट स्थिती
गेल्या वर्षी तालुक्यात सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाला होता. यामुळे दीर्घकालानंतर अंजनी नदीचे पात्र तब्बल तीन महिने प्रवाही होते. यंदा स्थिती उलट आहे. पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात अंजनी धरण शंभरीकडे वाटचाल करत असल्याने नदीत विसर्ग सुरू झाला. यामुळे नदीला हलका पूर देखील आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *