अमळनेर : लॉकडाऊनचा फायदा घेत तापीतून अवैध वाळू उपसा

अमळनेर क्राईम सिटी न्यूज

अमळनेर > सध्या सर्वदूर कोरोनाने थैमान घातले आहे. मात्र, लॉकडाऊनचा गैरफायदा घेत मठगव्हाण, नालखेडा व जळोद येथील तापी नदीपात्रातून रात्रीच्या वेळेस बेसुमार वाळू उपसा होत आहे.

सध्या तहसील प्रशासन कोरोनाच्या कर्तव्यात व्यस्त असल्याचा फायदा घेत चोरट्या मार्गाने वाळू वाहतूक करणा-यांचे चांगलेच फावले आहे. पातोंडा, दापोरी, दहिवद व शेजारील गावांमधे रात्रीच्या वेळेस अवैध वाळू वाहतूक केली जात असल्याचे नागरीकांमधून सांगितले जात आहे. तसेच कोरोनामुळे खुपच अडचणी असल्याने घरांचे बांधकाम करणा-या सामान्य नागरीकांना अवाजवी भावाने अवैध पुरवठा केला जातो.

या वाळू तस्करांचे गावोगावी एजंट असून यांच्या मध्यस्तीने ऑर्डर घेऊन रात्रीच्या वेळी खुपच सावधानी बाळगत महसूल प्रशासनाची चाहूल घेत वाळू पुरवठा केला जात आहे. प्रशासन एकीकडे कोरोनाशी दोन हात करण्यात गुंतले असतांना या संधीचा वाळू माफिया चांगलाच फायदा उचलतांना दिसत आहेत. मठगव्हाण नालखेडा येथील उत्तरेकडील नदी पात्रातून चोपडा तालुक्यात देखील भरमसाठ प्रमाणात वाळू वाहतूक केली जात असून याकडे संबंधितांचे हेतूपुर्वक दुर्लक्ष होत असल्याचे देखील बोलले जात आहे.

प्रा.आ.केंद्राच्या कामावर शेकडो ब्रास वाळू साठा
पातोंडा येथे प्रा आ केंद्राच्या नुतन इमारतीचे बांधकाम सुरू असून या ठिकाणी शेकडो ब्रास वाळू साठा आहे. नदीपात्रात कोणत्याही गटाचा लिलाव गेला नसतांना येवढ्या मोठ्या प्रमाणात वाळू वाहतूक कोठून होत आहे अशा प्रकारे संशयात्मक चर्चा ग्रामस्थांमधून होत आहे. तसेच सदर कामाच्या ठिकाणी वाळू साठा हा आधीपासूनच असून शेकडो ब्रास वाळू साठा असतांना महसूल प्रशासनाकडून त्याची साधी चौकशी देखील झाली नसल्याच्या चर्चेला चांगलेच उधाण आले आहे.

अवैध व्यवसायांसंबधी व्हॉटसऍप गृपवर
सध्या पातोंडा गावातील तरूणांमधे जोरदार चर्चा असून या अवैध व्यवसांयांना प्रशासनातुनच खतपाणी तर घातले जात नाही ना अशी शंका घेतली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *