अमळनेर पोलिस निरीक्षक मोरे यांना भोवले होर्डिंग प्रकरण ; नियंत्रण कक्षात बदली

अमळनेर पाेलिस

अमळनेर प्रतिनिधी >> शहरातील एका धार्मिक कार्यक्रमाचे बॅनर काढण्याचे पडसाद राज्यभर उमटले. याप्रकरणी पोलिस निरीक्षक अंबादास मोरे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी बुधवारी भुसावळ येथील बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप भागवत यांना प्रभारी पदभार स्विकारला.

दीड वर्षांपूर्वी अंबादास मोरे अमळनेर पोलिस ठाण्यात रुजू झाले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या कार्यपद्धतीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. शहरातील अवैध व्यावसायिकांवर विशेष महानिरीक्षकांच्या पथकाने तीनवेळा छापा टाकला होता.

या कारवाईतून शहरात मोठ्या प्रमाणात जुगाराचे अड्डे सुरू असल्याचे आढळून आले होते. तसेच पोलिस स्टेशनच्या निरीक्षणात महानिरीक्षकांनी गुन्ह्यांच्या तपासाबाबत नाराजी व्यक्त केली होती. तत्पूर्वी निरीक्षक मोरे यांच्या दोन वेतनवाढ रोखण्याची कारवाई त्यांनी केली होती.

तसेच पोलिस अधीक्षकांनीदेखील मोरे यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा अहवाल पाठवला होता. त्यानंतर दहिवद येथील पोस्कोच्या गुन्ह्यातील संशयिताला सोडून दिल्याची तक्रारही पोलिस अधीक्षकांनी केली होती. या सर्व कारणांवरून निरीक्षक मोरे यांची उचलबांगडी करण्यात आली आहे.

१६ रोजी पालिकेचे उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांनी अनधिकृत बॅनर काढण्याची कारवाई केली. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. मात्र, गायकवाड यांची तक्रार पोलिसांनी घेतली नव्हती. त्यामुळे पोलिसांविरुद्ध पोस्ट टाकून गायकवाड बेपत्ता झाल्याने प्रकरण चिघळले. कायदा सुव्यवस्थेची स्थिती हाताळण्यात निरीक्षक मोरे अपयशी ठरल्याने, त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.