टोळी येथील अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपीस २३ पर्यंत पोलिस कोठडी

अमळनेर क्राईम पारोळा

पारोळा प्रतिनिधी >> टोळी (ता.पारोळा) येथील २० वर्षीय तरुणीवर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी शिवनंदन शालिक पवार याला १९ नोव्हेंबरला अटक करण्यात आली. यानंतर त्यास २० नोव्हेंबरला अमळनेर जिल्हा सत्र न्यायालयात हजर केल्यावर २३ पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

टोळी येथील तरुणी पारोळा येथील मामांकडे आली होती. तिचे अपहरण करून तिघांनी सामूहिक अत्याचार केला. यानंतर उपचारादरम्यान तिचा धुळे येथे मृत्यू झाला. अत्याचारानंतर आरोपींनी तिला विष पाजले, असा आरोप करत नातेवाइकांनी पारोळा पोलिस ठाण्यात खून, बलात्कार आदी विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.

या गुन्ह्यात एकूण ३ आरोपींचा समावेश आहे. शिवाय कासोदा येथील एका संशयित महिलेची देखील चौकशी सुरू आहे. दरम्यान, या घटनेतील मुख्य संशयित शिवनंदन पवार याने विष घेत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याच्यावर धुळे येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. तेथून डिस्चार्ज मिळताच पोलिसांनी १९ नोव्हेंबरला त्यास अटक केली. यानंतर २० नोव्हेंबरला त्यास अमळनेर येथील न्यायालयात हजर करण्यात आले. तेथे त्याला २३पर्यंत पोलिस कोठडी मिळाली.

दरम्यान, पवार याला न्यायालयात हजर केले. येथे सरकारी वकील किशोर बागुल यांनी आरोपीकडून गुन्ह्यातील मोबाईल हस्तगत करणे, घटनास्थळ दाखवणे, विषाची बाटली कोणाकडून घेतली? सोबत आणखी कोण तरुण होते का? आणखी काही आरोपी होते का? याची माहिती घेण्यासाठी त्यास पोलिस कोठडी द्यावी, अशी मागणी केली.