२२ वर्षीय डॉक्टर तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

आत्महत्या क्राईम जामनेर पहूर

पहूर ता. जामनेर प्रतिनिधी >> डॉक्टर असलेल्या २२ वर्षीय तरुणीने येथील संतोषी माता नगरातील घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी दुपारी ही घटना उघडकीस आली.

संतोषी माता नगरातील रहिवासी शाम नामदेव सावळे यांची मुलगी प्रतिभा शाम सावळे ( वय २२) हिने दुपारी घरी कुणीही नसताना गळफास घेतला.

१५ डिसेंबरला दुपारी ३ वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. तिचे वडील, शाम सावळे हे घरगुती कामानिमित्त पत्नी व मुलासह बाहेरगावी गेले होते. त्यांची एक मुलगी बुलडाणा येथे शिक्षण घेत असून मोठी मुलगी डॉ. प्रतिभा सावळे ही एकटीच घरी होती.

मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास काका राम सावळे यांनी घराचा दरवाजा ठोठावून प्रतिभाला आवाज दिला. मात्र, प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी मागील दरवाजाने घराच्या आत प्रवेश केला. यावेळी त्यांना प्रतिभाचा मृतदेह लटकलेला दिसला. यामुळे त्यांनी आक्रोश केला.

पहूरचे पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांनी पाहणी करून घटनास्थळाचा पंचनामा केला. मृतदेह ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. रात्री उशिरा शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी काका राम सावळे यांच्या माहितीवरून पहूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद झाली.