पोलिसांत एफआयआर दाखल झाल्यानंतर ३१ पीडितांना १८ लाखांचे अर्थसाहाय्य

Jalgaon Jalgaon MIDC Social कट्टा कट्टा जळगाव पाेलिस

जळगाव ::> जिल्ह्यात ऑगस्टअखेर अनुसूचित जातीचे २३ तर अनुसूचित जमातीचे १५ अशा एकूण ३८ गुन्ह्यांचा पोलिस तपास सुरू आहे. तपासावर त्यापैकी १४ गुन्ह्यांची निर्गती पोलिस विभागाने केली आहे.

उर्वरित २४ व सप्टेंबपर्यंत दाखल झालेले ६ असे एकूण ३० गुन्ह्यांमध्ये पोलिस तपास सुरू आहे. त्याचबरोबर सप्टेंबरमध्ये ३१ पीडितांना एफआयआर दाखल झाल्यानंतर १८ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य मंजूर करण्यात आल्याची माहिती समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी दिली.

जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झाली.

अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, समितीचे सदस्य सचिव तथा समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, सहायक पोलिस निरीक्षक पी. एस. सपकाळे यांच्यासह आदिवासी विकास, जिल्हा परिषद, समाजकल्याण विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी अभिजित राऊत म्हणाले की, अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यांतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यांचा तपास लवकरात लवकर पूर्ण करून खऱ्या गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे. यासाठी संबंधित यंत्रणांनी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी, असे ते म्हणाले.