शेख बिस्मिल्ला यांच्या उपक्रमाचे साकळीकरांनी केले कौतुक
यावल : कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी सध्या सर्वत्र संचारबंदी असल्याने गावातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद असल्याने दुकानदारांचे उत्पन्न येणे बंद असल्याने त्यांना आपल्या कुटुंबाचा चरितार्थ भागवणे सुद्धा कठीण बनले आहे.
या सर्व परीस्थितीचा सारासार विचार करून बाबा व्यापारी संकुलाच्या मालकाने आपल्या व्यापारी संकुलातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर 12 दुकानांचे चाळीस जवळपास दिवसांचे भाडे माफ केलेले आहे. यामुळे दुकानदारांना मोठा आर्थिक दिलासा मिळाल्याने दुकानदारमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण आहे.

शेख बिस्मिल्ला यांच्या उपक्रमाचे कौतुक
छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मुख्य रस्त्यालगत माजी ग्रा.सदस्य शेख बिस्मिल्ला शेख रहेमान (बाबा मेंबर) यांच्या मालकीचे ‘बाबा’ व्यापारी संकुल आहे. या व्यापारी संकुलात अत्यावश्यक सेवा देणार्या किराणा दुकान सह सलून, टेलरींग, लॉन्ड्री, इलेक्ट्रिक मोटार वाइंडिंग यासह इतर किरकोळ व्यवसायांचे दुकाने आहेत. तथापि कोरोनामुळे लॉकडॉऊन असल्याने अत्यावश्यक सेवा वगळता गेल्या जवळपास दीड महिन्यांपासून इतर सर्व दुकाने बंद आहे.
त्यामुळे या काळात दुकानदारांचे आर्थिक उत्पन्न नसल्याने आपल्या दुकानाचे भाडे कसे भरावे ? अशी विवंचना दुकानदारांना होती. मात्र दुकानदारांच्या सदर विवंचनेचा सहानुभूतीपूर्वक विचार करून संकुलाचे मालक शेख बिस्मिल्ला ( बाबा मेंबर) यांनी 22 मार्च 2020 ते 30 एप्रिल 2020 यादरम्यानचे जवळपास चाळीस दिवसांचे अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरित 12 दुकानांचे जवळपास बावीस हजार रुपयांचे भाडे माफ करुन आपल्या कृतीतून एक आदर्श माणुसकीची भावना व्यक्त केलेली आहे.
ऐन पवित्र रमजान महिन्यात शेख बिस्मिल्ला ( बाबा मेंबर) यांच्या हातून मानवतेचे व पुण्याचे सत्कर्म घडल्याने त्यांच्या या कृतीला धार्मिकदृष्ट्या खूप मोठे महत्त्व प्राप्त झालेले असून त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
दुकान मालकाचा कायम राहणार ऋणी
गावात सर्वत्र संचार बंदी असल्याने गेल्या जवळपास दीड महिन्यांपासून बाबा कॉम्प्लेक्समधील माझे सलूनचे दुकान बंद असल्याने माझे आर्थिक उत्पन्न शून्य आहे. तथापि आमच्या दुकान मालकाने माझ्या दुकानाचे भाडे माफ करुन मला मोठा दिलासा दिलेला आहे. त्यांचा मी कायम ऋणी राहील, अशी भावना गजानन सलूनचे संचालक घनःश्याम झुरकाळे यांनी व्यक्त केली