लॉकडाऊन च्या ४० दिवसात १० गावात फिरून केली जनजागृती.

अडावद चोपडा

पूर्ण ४० दिवस गावात उभे राहुन तोंडाला मास्क बांधा, बाहेर निघू नका म्हणून केली विनंती

धानोरा विद्यालयातीत क्रीडाशिक्षक देविदास महाजन यांनी केले प्रबोधन.

१० गावापैंकी सहा गावे आदिवासी

प्रशांत चौधरी  धानोरा ता चोपडा. (वार्ताहर )

कोरोना व्हायरस धोका पाहता आपला जीव धोक्यात घालुन येथिल क्रिडाशिक्षकाने धानोरासह १० गावांमध्ये जात कोरोना व्हायरस ची जनजागृती केली.यावेळी त्यांनी तोंडाला मास्क बांधा,बाहेर फिरु नका,कायद्याचा सन्मान करा अशी हात जोडून विनंती करुन प्रबोधनही केले.त्यांच्या या कार्यात प्राथमिक आरोग्य केंद्र,अडावद पोलिस ठाणे,पोलिस पाटील,डॉ बी आर आंबेडकर मोफत अभ्यासिका,पोदार जंम्बो किड्स यांचेही सहकार्य मिळाले.

   याबाबत सविस्तर असे की,येथिल झि तो महाजन माध्यमिक व ना भा पाटील ज्युनिअर कॉलेज मधील क्रीडाशिक्षक तथा राज्यस्तरीय खो खो पंच व योगशिक्षक देविदास महाजन यांनी लॉकडाऊन चे संपूर्ण ४० दिवस आपल्या गावासहीत परीसरातील सातपुडा पर्वतातील बिडगाव,मोहरद,कुंड्यापाणी,वरगव्हाण,लोणी, खर्डी,पंचक,देवगाव,पारगाव तसेच गावातील संवेदनाशील इंदिरा नगर मध्ये जाऊन जनजागृती केली.यात त्यांनी स्वतः चा जीव धोक्यात घातला.दरम्यान त्यांनी स्वतः संपूर्ण काळजी घेऊन प्रबोधनावर भर दिला.यात त्यांनी विविध गावांमध्ये जाऊन प्रत्येकाने तोंडाला मास्क अथवा स्वच्छ धुतलेला रुमाल बांधणे,कुणीही बाहेर निघु नका,लॉकडाऊन चे प्रत्येकाने पालन करा,कायद्याचा सन्मान करा,वारंवार हात धुवा,शक्यतो सॕनिटायझर चा वापर करावा,पोलिसांना सहकार्य करा,किराणा दुकानात गर्दी करु नका,अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडतांना दोन जणांमध्ये विशेष अंतर ठेवा अशा सुचना हातात माईक घेत दिल्यात.यात त्यांनी अबालवृद्ध-दिव्यांग यांच्याशी विशेष संवाद साधत त्यांनीही काळजी घ्यावी असाही सल्ला दिला.विशेष म्हणजे सकाळी ७ वाजेपासुन ते रात्री ८ असे तब्बल तेरा तास थांबून जनजागृती केली आहे.

    संपूर्ण देशात लॉकडाऊन असल्याने जिकडे-तिकडे लोक घरात बसलेली होती.काही विनाकारण बाहेर फिरतांना आढळत होते.ग्रामीण भागात लॉकडाऊन चे गांभीर्य लक्षात घेत महाजन यांनी स्वंयस्फुर्तीने पुढाकार घेतला होता.यात त्यांनी दि २५ मार्च ते १४ एप्रिल पर्यंत गावातील मुख्य चौकात थांबत प्रत्येक येणाऱ्या-जाणा-यांना आपली काळजी घेतली पाहीजे असे आवाहन करत होते.पुढचा टप्पा ३ मे पर्यंत सुद्धा जनजागृती केली. इस्लामपुरा,इंदिरानगर,आंबेडकर नगर,कोळी वाडा,गांधी चौक,सदगुरु नगर यासह प्रत्येक वाड्या-गल्लीत जात घरी रहा व सुरक्षित रहा असा संदेश दिला.यावेळी काही उपद्रवींनी जाणुन-बुजुन त्रास देण्याचा प्रयत्न केला पण ते डगमगले नाहीत.

यांचे मिळाले सहकार्य 

स्वंयस्फुर्तीने गावात व परीसरातील विविध गावात आपण स्वतः जाऊन जनजागृती करावी अशी इच्छा देविदास महाजन यांची होती.त्यांनी येथिल प्राथमिक आरोग्य केंद्राकडून मदत मागितली.त्यांच्या या कार्यात पंचायत समिती सदस्या कल्पना पाटील,सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश तांदळे,वैद्यकीय अधिकारी डॉ उमेश कवडीवाले,डॉ अमोल पाटील,पोलिस पाटील दिनेश पाटील, धानोरा पत्रकार संघाचे प्रशांत चौधरी, राजेन्द्र चौधरी, वासुदेव महाजन ,डॉ आंबेडकर अभ्यासिका चे प्रशांत सोनवणे,पोदार जंम्बो किड्स चे योगेश गुजर,प्रविण ठाकूर,संदिप पवार,जयेश चौधरी, दहा गावातील सर्वच पोलिस पाटील,सामाजिक कार्यकर्ते यांनी गावा-गावात फिरण्यासाठी मदत केली.यावेळी गावातील प्रत्येक गल्लीत जात लाऊड स्पिकर लावुन माईकवरुन जनजागृती केली.

राज्यस्तरिय खो-खो पंच,योगशिक्षक म्हणुन ओळख

देविदास महाजन यांची ओळख हे राज्यस्तरिय खो-खो सामन्यांमध्ये पंच म्हणुन कामही करतात.तसेच राज्यस्तरिय योगशिक्षक म्हणुन ही सन्मानही करण्यात आला आहे.गेल्या दोन महीन्यापूर्वी त्यांनी चोपडा,यावल तालुक्याती जि प शाळा व माध्यमिक शाळा अशा तब्बल १०० वर शाळांमध्ये योग शिक्षणाचे धडे दिले आहे.त्यांची मुलगी खुशबु महाजन ही देखिल राष्ट्रीय बॉक्सर आहे.ती सध्या घरीच बॉस्किंग चा सराव करतांना दिसते.

जनजागृती साठी लढा सुरुच राहील.

ग्रामीण भागात जनजागृती व प्रबोधन करणे आवश्यक होते.यामुळे मी स्वतः आमच्या गावासहीत विविध गावामध्ये जात प्रबोधन केले.वेळोवेळी विनाकारण वाद उफाळले पण लक्ष न देता काम सुरु ठेवले.पुढेही असे अनेक कार्ये सुरु राहतील. देविदास महाजन, क्रिडाशिक्षक धानोरा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *