आपत्ती काळातील आरोग्य विभागाचे कार्य अभिमानास्पद : प्रविण माने

Politicalकट्टा जगाच्या पाठीवर महाराष्ट्र


इंदापूर : महेश तुपे

संपूर्ण जगभर कोरोनाचा प्रादुर्भाव बोकाळला असताना, त्याच्या विरोधात उभे राहत कार्य करणाऱ्या आरोग्यदूतांचे कार्य भावी पिढ्यांना मानदंड ठरत असल्याचे गौरवोद्गार जिल्हा परिषद सदस्य प्रविण माने यांनी काढले. रविवारी (दि.३) पळसदेव (ता. इंदापूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ते बोलत होते.

कोविड-१९ विरोधातील या लढ्यात सर्वचजण तन-मन-धन अर्पून काम करत आहेत. डॉक्टर, पोलिस, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी, रुग्णवाहिका चालक, अत्यावश्यक सेवा कर्मचारी, यांनी या कामात स्वतःला झोकून दिले आहे.

काही दिवसांपूर्वी भिगवण येथे कोरोनाबाधित महिला आढळल्याने, तालुक्यात काहीसे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. लढणे हे आपले आद्य कर्तव्यच आहे, आणि सर्वच आघाड्यांवर इंदापूरकर या गोष्टी करत आहेत. याच पार्श्वभूमीवर पळसदेव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत प्रविण माने यांनी वार्तालाप केला.

या संवादादरम्यान विविध विषयांवर चर्चा झाली. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या, गावोगावी जात रुग्णांची पाहणी करणाऱ्या आशासेविका, आरोग्यसेवकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या, तसेच सर्वांच्या कार्याचे कौतुक करत त्यांच्या कार्याविषयी माने यांनी आभार व्यक्त करत त्यांचे मनोधैर्य वाढविण्याचे काम केले. तसेच जिल्हा परिषदेमार्फत योग्य ते सेवा देण्यास आपण कटिबद्ध असल्याचेही वचन यावेळी प्रविण माने यांनी दिले.

जिल्हा परिषदेच्यामार्फत राबविण्यात आलेल्या शरद भोजन योजनेंतर्गत धान्य वाटपाच्या कार्याला सुरुवात झाली असून पात्र व गरजू नागरिकांपर्यंत ही मदत पोहचण्यासाठी आपण स्वतः लक्ष देत असल्याचे प्रतिपादन प्रविण माने यांनी केले.

यावेळी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब काळे, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, तालुका आरोग्य अधिकारी सुरेखा पोळ, माजी जि.प. सदस्य हनुमंत बनसोडे, मेघराज कुचेकर, सुजित मोरे, निलेश रंदवे, डॉक्टर्स, आरोग्यसेवक-आरोग्यसेविका, आशा वर्कर्स उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *